बेळगाव : एस. के.ई. सोसायटी संचलित ठळकवाडी हायस्कूल, टिळकवाडी यांच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाला बुधवार, १० डिसेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता आर.पी.डी. कॉलेजच्या मैदानावर प्रारंभ झाला. विविध स्पर्धांद्वारे विद्यार्थ्यांच्या क्रीडा क्षमतेचा आविष्कार करण्यासाठी दरवर्षी आयोजित केला जाणारा हा महोत्सव यंदाही उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे चेअरमन भरत शानभाग अध्यक्षस्थानी होते. क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन सुप्रसिद्ध स्ट्रक्चरल इंजिनिअर विनय बेहरे, तसेच रॉ फिटनेस जिमचे संचालक विजय चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक आर.आर. कुडतुरकर मान्यवरांसह उपस्थित होते.
उद्घाटनाच्या विधीमध्ये हनुमान प्रतिमेचे पूजन व ध्वजारोहन करण्यात आले. शिक्षक सी. वाय. पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तर मुख्याध्यापकांनी सर्वांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या भव्य पथसंचलनाने कार्यक्रमाला रंग चढला. क्रीडाज्योत मान्यवरांना सुपूर्द करून विद्यार्थ्यांनी स्पर्धांच्या प्रारंभाचा संदेश दिला. शपथविधी विद्या करेगार यांनी संपन्न केला.
उद्घाटक विनय बेहरे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश देताना म्हटले की, “खेळातून सहकार्य, शिस्त आणि संघभावना विकसित होते. पराभव आणि विजय या दोन्ही अनुभवांमधून शिकत सातत्याने प्रयत्न करणाऱ्यांनाच यश मिळते.”
कार्यक्रमाच्या सांगता समारंभाध्यक्ष भरत शानभाग यांच्या मार्गदर्शनपर भाषणाने झाली. क्रीडा महोत्सवाच्या आयोजनात सहभागी सर्व शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी यांचे आभार एस. व्ही. भातकांडे यांनी मानले. सूत्रसंचालनाची जबाबदारी सी. वाय. पाटील यांनी सक्षमपणे पार पाडली.

