बेळगाव तालुक्यातील कंग्राळी बुद्रुक येथे 28 एप्रिल 2026 रोजी आयोजित महालक्ष्मी यात्रेच्या तयारीला आता वेग आला आहे. या पारंपरिक यात्रेची पूर्वतयारी भक्कम करण्यासाठी ग्रामीण भागातील विकास प्रकल्पांना नवी चालना देत आमदार व मंत्री लक्ष्मीताई हेब्बाळकर यांनी गावाला तब्बल दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
गावातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी या निधीतून शाहूनगर ते कंग्राळी या मुख्य रस्ता गटार बांधकामासाठी चार कोटी ४० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच गावातील इतर महत्त्वाच्या रस्त्यांचे डांबरीकरण, दुरुस्ती आणि गटारीची कामेही झपाट्याने सुरू करण्यात आली आहेत. ही सर्व कामे आगामी यात्रेपूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या विकासकामांच्या भूमिपूजन प्रसंगी बोलताना मंत्री लक्ष्मी ताई हेब्बाळकर म्हणाल्या,
“मी या गावाची मुलगी आहे. यात्रेपासून यात्रेअखेरपर्यंत गावाची जबाबदारी माझीच आहे. यात्रेदरम्यान अग्निशामक दल, रुग्णवाहिका आणि पोलीस दल 24 तास सज्ज राहील. यात्रेची शिस्त आणि सुरक्षा राखणे सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे.”
यात्रेपूर्वी वनविभाग व हेस्कॉनकडून आवश्यक सर्व परवानग्या मिळवून देण्याची जबाबदारीही त्या स्वतः घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दहा कोटींच्या पॅकेजमध्ये गावातील अंगणवाडीसाठी तीन नवीन इमारती उभारण्याचेही काम हाती घेण्यात आले असून, या प्रकल्पांना मंत्री लक्ष्मीताई हेब्बाळकर व त्यांचे चिरंजीव मृणाल हेब्बाळकर यांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले.
या कार्यक्रमास ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी, यात्रा समितीचे अध्यक्ष-उपाध्यक्ष, सदस्य तसेच ग्रामस्थांचा मोठा सहभाग दिसून आला. गावातील पायाभूत सुविधा मजबूत झाल्याने यंदाची महालक्ष्मी यात्रा अधिक भव्य आणि सुयोजित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

