बेळगाव : पदवीपूर्व शिक्षण खात्यामार्फत दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या क्रीडा महोत्सवाचा एक महत्त्वाचा भाग ठरलेली राज्यस्तरीय स्केटींग स्पर्धा यंदा बेळगावात भव्य उत्साहात पार पडली. यंदाच्या महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरलेली ही स्केटींग स्पर्धा एस.के.ई. सोसायटीच्या जी.एस.एस.पी. पीयू कॉलेज आणि शिवगंगा स्पोर्ट्स क्लब यांच्या सहकार्याने शिवगंगा स्केटींग मैदानावर आयोजित करण्यात आली.
या स्पर्धेत 13 जिल्ह्यांतील मुलांचे तर 10 जिल्ह्यांतील मुलींचे संघ सहभागी झाले होते. स्पर्धेचे उद्घाटन बुधवारी पहाटे ६ वाजता करण्यात आले. प्रारंभिक सत्राला डी.डी.पीयू एम.एम. कांबळे, जी.एस.एस.पी. पीयू कॉलेजचे प्राचार्य एस.एन. देसाई, विविध महाविद्यालयांतील प्राचार्य, क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक आणि शिवगंगा स्पोर्ट्स क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.
पहाटेपासूनच स्पर्धकांनी उल्लेखनीय उत्साह दाखवत मैदान गजबजून गेले होते. राज्यातील 23 जिल्ह्यांतील स्पर्धक आणि प्रशिक्षकांनी स्पर्धेला विशेष उभारी दिली.
दुपारी 10 वाजता मैदानावर विविध स्पर्धांचा पुढील टप्पा पार पडला. इनलाईन, क्वाड, 500 मीटर, 1000 मीटर, रोड रेस आदी विविध प्रकारच्या स्पर्धांमध्ये मुलं आणि मुली अशा दोन्ही गटांत तीव्र चुरस पाहायला मिळाली.
राष्ट्रीय स्तरासाठी निवड
उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे काही खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
मुलांचे इनलाईन गट :
कुमार तन्मय एम. कोठारे (मंगलुरू)
कुमार हर्षित बी. टी. (मैसूर)
कुमार वैष्णव एम. उपाध्ये
मुलांचे क्वाड गट :
कुमार अक्षय के.
कुमार विवेन जैन (बेंगळुरू साऊथ)
कुमार निर्मय वाय. एन. (मंगलुरू)
मुलींचे इनलाईन गट :
कुमारी वर्षीनी अपर्णा (बेंगळुरू नॉर्थ)
कुमारी प्रतिक्षा के.एस. (मैसूर)
कुमारी एस. प्रेरणा गणेश (बेंगळुरू नॉर्थ)
मुलींचे क्वाड गट :
कुमारी सौजन्या शेषगीरी (धारवाड)
कुमारी बिंदू बी.एम. (बेंगळुरू नॉर्थ)
कुमारी ऐश्वर्या एन. (बेंगळुरू नॉर्थ)
सर्वसाधारण विजेते
मुलांचा गट – बेंगळुरू नॉर्थ
मुलींचा गट – बेंगळुरू साऊथ
पारितोषिक वितरण समारंभ
शिवगंगा स्पोर्ट्स क्लबमध्ये पार पडलेल्या पारितोषिक समारंभात एम.एम. कांबळे, प्रमुख पाहुणे प्रसाद तेंडुलकर, विविध पंच, प्रशिक्षक आणि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात कुमारी अर्पिता व समूह यांच्या स्वागतगीताने झाली. सूत्रसंचालन प्रा. डॉ. कीर्ती फडके आणि प्रा. सविता कुलकर्णी यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात मान्यवरांनी खेळाडूंना प्रोत्साहन देत राज्यातील स्केटींग क्रीडा अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला.

