जमखंडी |
महाराष्ट्राच्या धर्तीवर उसाला जास्त दर मिळावा, या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले मुडहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन आज अचानक तीव्र झाले. शांततापूर्ण पद्धतीने सुरू असलेल्या या आंदोलनाने सायंकाळी उग्र वळण घेतले आणि परिस्थिती पूर्णपणे अनियंत्रित झाली.
समीरवाडी येथील गोदावरी बायो रिफायनरी साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाने चर्चेला न येत असल्यामुळे शेतकऱ्यांचा रोष वाढला. सकाळपासून शेतकरी ट्रॅक्टरसह कारखान्याला घेराव घालण्यासाठी निघाले होते. परिस्थिती व्यवस्थित असतानाच संध्याकाळी आंदोलन पेटले.
प्रथम रस्त्यावर उभ्या असलेल्या उसाने भरलेल्या चार ट्रॅक्टरना आग लावण्यात आली. अग्निशमन दलाने तत्काळ आग विझवण्याचा प्रयत्न केला. तथापि, त्यानंतर कारखान्याच्या आवारातील इतर ट्रॅक्टरवरही संतप्त शेतकऱ्यांनी हल्ला चढवला. काही मिनिटांतच 30 हून अधिक ट्रॅक्टर आणि अंदाजे 100 ट्रॉली जळून खाक झाल्या, तर परिसरातील अनेक दुचाकीदेखील आगीत भस्मसात झाल्या.
आगीची तीव्रता इतकी होती की संपूर्ण कारखाना परिसर ज्वाळांनी वेढला गेला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला; मात्र तुफान दगडफेक झाल्याने अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुखांसह अनेक पोलिस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले. त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सूत्रांनी सांगितले.
जिल्हा प्रशासनाने तातडीने सुरक्षा वाढवली असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला आहे. परिसरात तणाव कायम असून अतिरिक्त फोर्स तैनात करण्याची तयारी सुरू आहे.

