बेळगाव (प्रतिनिधी):
बेळगावातील नार्वेकर गल्ली येथील ज्योतिर्लिंग देवस्थानात रविवारी कार्तिक उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. या धार्मिक सोहळ्याचे यंदाचे हे ६६ वे वर्ष असून, पारंपरिक विधी आणि महाप्रसादाच्या वाटपाने उत्सवाची सांगता झाली.
सकाळी कार्यक्रमाची सुरुवात होम हवनाने झाली. त्यानंतर लघुरुद्राभिषेक आणि सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले. दुपारी महाआरती पार पडली आणि सायंकाळी सात वाजता कार्तिकोत्सवाचा मुख्य सोहळा साजरा करण्यात आला.
उत्सवानंतर रात्री महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमात सहभाग घेतला. संपूर्ण परिसरात ‘हर हर महादेव’च्या घोषणांनी भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरवर्षीप्रमाणे या वर्षीही भक्तगणांनी या उत्सवात उत्साहाने सहभाग घेतला.
या निमित्ताने दादा महाराज अष्टेकर भक्त मंडळाच्या वतीने सर्व नागरिकांना महाप्रसादाचा लाभ घ्यावे, असे आवाहन करण्यात आले.

