दरशन वरूरचा ‘दसऱा सीएम कप 2025’ मध्ये दमदार जलतरण जलवा!
म्हैसूर : कर्नाटकातील प्रसिद्ध दसऱा सीएम कप 2025 जलतरण स्पर्धेत बेळगावच्या तरुण जलतरणपटू दरशन वरूर याने उत्कृष्ट कामगिरी करत दोन पदके जिंकत बेळगावचा मान उंचावला आहे.
२२ ते २५ सप्टेंबरदरम्यान चामुंडी विहार अॅक्वाटिक कॉम्प्लेक्स, म्हैसूर येथे पार पडलेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेत दरशनने एक रौप्य (सिल्व्हर) आणि एक कांस्य (ब्राँझ) पदक पटकावले. त्याच्या या यशामुळे बेळगावातील जलतरण क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरशन हा स्विमर्स क्लब बेळगाव आणि अक्वेरियस स्विम क्लब बेळगावचा प्रतिनिधी आहे. तो के.एल.ई. सुवर्णा जे.एन.एम.सी. ऑलिंपिक साईझ स्विमिंग पूल, बेळगाव येथे प्रशिक्षक उमेश काळघटगी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतो. त्याच्या प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षक अक्षय शेरगर, अजिंक्य मेंढके, नितीश कुडुचकर, गोवर्धन काकतकर आणि इम्रान उचगावकर यांचेही मोलाचे योगदान आहे.
दरशनच्या या यशामागे सततचा प्रयत्न आणि त्याला मिळालेला संस्थात्मक पाठिंबा महत्त्वाचा ठरला. डॉ. प्रभाकर कोरे (अध्यक्ष, के.एल.ई. सोसायटी), श्री. जयंते हुम्बरवाडी (अध्यक्ष, जयभारत फाउंडेशन), रोटेरियन अविनाश पोटदार, सौ. मॅनेक कापाडिया, सौ. लता कित्तूर, सुधीर कुशाणे, आणि प्रसाद तेंडोलकर यांनी दिलेल्या प्रेरणा आणि सहाय्यामुळे हे यश शक्य झाले आहे.
बेळगावच्या जलतरण क्षेत्रात नव्या पिढीतील दरशनसारख्या खेळाडूंमुळे भविष्यातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरीची आशा निर्माण झाली आहे.

