नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली सोमवारी (10 नोव्हेंबर) संध्याकाळी झालेल्या भीषण स्फोटाने हादरली. ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ उभ्या असलेल्या कारमध्ये झालेल्या या स्फोटामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, या स्फोटात किमान 10 जणांचा मृत्यू झाला असून 30 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. त्यापैकी काहींची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. स्फोटाचा आवाज इतका जबरदस्त होता की आसपासच्या दुकानांच्या खिडक्या-दारं फुटली आणि काही वाहनांनाही आग लागली.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटानंतर परिसरात काही वेळ काळोख आणि गोंधळाचे वातावरण होते. तात्काळ अग्निशमन दल, दिल्ली पोलिस आणि बॉम्ब शोध पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
जखमींना लोकनायक जयप्रकाश नारायण (LNJP) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालय प्रशासनाच्या माहितीनुसार, एकूण 15 जखमींना तेथे आणण्यात आले असून, त्यातील 8 जणांचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला आहे. तीनजणांवर अतिदक्ष विभागात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी प्राथमिक तपासात गॅस सिलिंडरचा स्फोट किंवा कारच्या बॅटरीमध्ये झालेली तांत्रिक बिघाडाची शक्यता वर्तवली आहे. तथापि, दहशतवादी हल्ल्याची शक्यता नाकारण्यात आलेली नाही.
दिल्ली पोलिस आणि दहशतवाद विरोधी पथक (ATS) यांनी घटनास्थळ सील करून तपास सुरू केला आहे. जवळच्या CCTV फुटेजची पाहणी करण्यात येत असून, एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहितीही सूत्रांकडून मिळाली आहे.
राजधानीतील या घटनेने संपूर्ण देशात चिंता आणि भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. गृह मंत्रालयाने या घटनेवर लक्ष ठेवले असून तपास अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

