बेळगाव : शहरात चोरी आणि घरफोड्यांचे प्रकार सातत्याने वाढत असून, मध्यवर्ती भागातील व्यापाऱ्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. पोलिसांच्या गस्ती असूनही चोरट्यांनी धाडसी कारवाया सुरूच ठेवल्या असून, काल रात्री पांगुळ गल्ली परिसरात तीन दुकाने फोडल्याची घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, बॅग विक्रीचे दुकान तसेच दोन कपड्यांची दुकाने यांचे शटर चोरट्यांनी रात्रीच्या अंधारात तोडले. दुकानातील रोख रक्कम आणि किमती साहित्य लंपास करण्यात आले. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्ट दिसून येत असून, चोरटा बॅटरीच्या उजेडात गल्ल्यातील रोख रक्कम व इतर वस्तू शोधत असल्याचे फुटेजमध्ये दिसते.
सकाळी दुकान उघडण्यासाठी आलेल्या मालकांच्या लक्षात ही घटना आल्यानंतर तात्काळ खडे बाजार पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा व प्राथमिक तपास सुरू केला आहे.
https://youtube.com/shorts/QpAwxfo26Fk?si=XKg9r1Uqdwyrhs3T
शहराच्या मध्यवर्ती भागात अशा प्रकारे सलग झालेल्या घरफोड्यांमुळे व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी खडे बाजार पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

