बेळगाव शहरातील गजबजलेल्या बाजारपेठेत बनावट चलन व्यवहार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, मार्केट पोलिसांनी तत्पर कारवाई करत आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
खडेबाजार परिसरातील एका दुकानात खरेदी केल्यानंतर आरोपींनी ५०० रुपयांच्या नोटा दिल्या. मात्र नोटांबाबत संशय आल्याने जागरूक दुकानदाराने त्वरित पोलिसांना माहिती दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयितांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये मोहम्मद अर्बाज, रुपेश वाकोडे, मोहम्मद हुसेन बक्षी (गोवा) आणि श्रवणकुमार (बिहार) यांचा समावेश आहे. प्राथमिक चौकशीत या आरोपींनी बनावट नोटा बाजारात फिरवण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली आहे.
पोलिसांनी आरोपींकडून ५०० रुपयांच्या ४९५ बनावट नोटा, सुमारे ४० हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन तसेच अंदाजे ३ लाख रुपये किमतीची कार असा एकूण साडेतीन लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई मार्केट पोलीस ठाण्याचे निरीक्षक जे. एम. कालमिर्ची आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. त्यांच्या या कामगिरीचे पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

