महाराष्ट्रातील हातकणंगल्याचे खासदार धैर्यशील माने धैर्यशील माने आणि कोल्हापूर जिल्हा शिवसेनाप्रमुख विजय देवणे आणि शिवसेना नेते संजय पवार सुनील मोदी आणि सुनील शिंत्रे यांना शनिवार दिनांक एक नोव्हेंबर रोजी बेळगाव जिल्ह्यात प्रवेश करण्यास बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे.
बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समिती शनिवारी कर्नाटक राज्योत्सव दिनी काळा दिन पाळणार आहे. खासदार धैर्यशील माने आणि कोल्हापुरातील शिवसेना नेते शनिवारी काळ्या दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन आक्षेपार्ह भाषण करण्याची शक्यता आहे. त्यामुळे बेळगावातील कन्नड आणि मराठी भाषिकात तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे असे पत्र बेळगावच्या जिल्हा पोलीस प्रमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे.
निपाणीच्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेते मंडळींनी खासदार धैर्यशील माने आणि कोल्हापुरातील शिवसेना नेत्यांना काळा दिन कार्यक्रमासाठी निमंत्रित केले असल्याची माहिती मिळाली असल्याचे पत्रात बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुखांनी नमूद केले आहे.
या पत्राला अनुसरून बेळगावचे जिल्हाधिकारी रोशन मोहम्मद यांनी खासदार धैर्यशील माने, शिवसेना नेते विजय देवणे, संजय पवार, सुनील शिंत्रे आणि सुनील मोदी यांना बेळगाव जिल्ह्यात एक नोव्हेंबर रोजी प्रवेश करण्यास बंदी घातली आहे.

