बेळगाव | 11 ऑक्टोबर 2025
राज्यात महिलांवरील अत्याचार आणि पावसामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेस सरकारने पूर्णपणे हात झटकला असल्याचा गंभीर आरोप भाजपा महिला मोर्चाच्या राज्य सचिव डॉ. सोनाली सर्नोबत यांनी केला आहे. “घोषणाबाजी आणि दिखाऊ दौऱ्यांपलीकडे हे सरकार काहीच करत नाही,” असा त्यांचा टोला आहे.
डॉ. सर्नोबत यांनी सांगितले की, अलीकडेच बेळगावात घडलेली महिला अत्याचाराची घटना संपूर्ण राज्याला हादरवून गेली. परंतु सरकारकडून पीडितेला न्याय मिळवून देण्याऐवजी विरोधकांवर आरोप करण्याचाच प्रयत्न दिसत आहे.
त्यांनी म्हटले, “महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न हा केवळ कायदा-सुव्यवस्थेचा नाही, तर कर्नाटकाच्या सन्मानाचा विषय आहे. मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्र्यांचा प्रतिसाद अत्यंत निष्काळजीपणाचा आहे.”
भाजपा महिला मोर्चाने या घटनांचा तीव्र निषेध नोंदवला असून, प्रत्येक जिल्ह्यात महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष पथके स्थापन करण्याची आणि दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
राज्यातील मुसळधार पावसामुळे ऊस, मका, भात, डाळी आणि भाजीपाला यासह अनेक पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून, शेतकरी हवालदिल झाले आहेत.
डॉ. सर्नोबत यांनी सांगितले, “पिकहानीग्रस्त शेतकऱ्यांकडे सरकारने पूर्ण दुर्लक्ष केले आहे. मदतीच्या घोषणांपलीकडे काहीच झालेले नाही. शेतकरी आज दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहेत आणि काहींनी तर आत्महत्येचा मार्गही स्वीकारला आहे.”
त्यांनी पुढे मागणी केली की — पिकहानीचे सर्वेक्षण पारदर्शक पद्धतीने करण्यात यावे, नुकसानभरपाई तातडीने जाहीर करून ती थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी.
डॉ. सर्नोबत यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की, “महिलांच्या सुरक्षेचा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा विचार करण्यात हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. सबबी देणे, केंद्रावर दोषारोप करणे आणि दिखाऊ दौर्यांनी राज्य चालत नाही.”
त्यांनी पुढे सांगितले की, “जनता सर्व पाहत आहे आणि योग्य वेळी उत्तरही देईल. भाजपा महिलांसाठी न्याय आणि शेतकऱ्यांसाठी हक्क मिळवण्यासाठी लढत राहील.”

