मराठा समाज विकासासाठी १,००० कोटींची मागणी; किरण जाधव यांचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना निवेदन
बेळगाव | प्रतिनिधी
मराठा समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी भरीव आर्थिक तरतूद करण्याची मागणी पुढे आली आहे. मराठा नेते किरण जाधव यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे कर्नाटक मराठा समाज विकास निगमासाठी किमान एक हजार कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्याची मागणी केली आहे.
https://youtube.com/shorts/1XXWNJ_Eslg?si=A1BXx7Qx3bTgd463
प्रसिद्धीपत्रकाद्वारे त्यांनी नमूद केले की, सध्या निगमाला मिळणारा निधी समाजाच्या वाढत्या गरजांच्या मानाने अपुरा ठरत आहे. उच्च शिक्षण, परदेशी शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण आणि आर्थिक स्वावलंबनासाठी आवश्यक असलेल्या योजनांना गती देण्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जाधव यांनी पुढे सांगितले की, प्रस्तावित निधीतून शिष्यवृत्ती योजनांचा विस्तार, परदेशी शिक्षणासाठी विशेष आर्थिक सहाय्य, शेती व पशुपालन क्षेत्रासाठी अनुदानित योजना, तसेच बेरोजगार युवकांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्याचे कार्यक्रम राबवता येतील. यामुळे स्वयंरोजगाराला चालना मिळून समाजाची आर्थिक पायाभरणी मजबूत होईल.
मराठा समाजाला शिक्षण आणि उद्योग क्षेत्रात अद्याप अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे अधोरेखित करत, राज्य सरकारने आगामी अर्थसंकल्पात विशेष पॅकेजची घोषणा करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

