बेळगाव, ५ ऑक्टोबर :
बेळगावच्या खेळाडूंनी आणि युवक-युवतींनी विविध क्षेत्रात घवघवीत यश संपादन करून शहराचे नाव उज्वल केले आहे. त्यांच्या या कामगिरीचा सन्मान करण्यासाठी सकल मराठा समाज, बेळगाव यांच्या वतीने विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम रविवार, ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता श्री जत्तीमठ, बेळगाव येथे होणार आहे.
🎖️ कुस्तीपटूंचा भव्य गौरव
कित्येक दशकांनंतर बेळगावच्या मातीतून पुन्हा एकदा कुस्ती क्षेत्रात मोठा झेंडा फडकवणाऱ्या पैलवान कामेश पाटील (कंग्राळी खुर्द) यांनी ‘दसरा कर्नाटक कंटीराव केसरी २०२५’ हा मानाचा किताब जिंकून ऐतिहासिक यश संपादन केले आहे. त्यांच्या सोबत मैसूर दसरा कुस्ती स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दहा कुस्तीपटूंचा देखील या सोहळ्यात सन्मान होणार आहे.
सन्मानित होणाऱ्या पैलवानांमध्ये —
प्रेम जाधव (कंग्राळी खुर्द), महेश बिर्जे (तीर्थ कुंडये), विनायक पाटील (येळूळर), समर्थ डुकरे (किणये), स्वाती पाटील (कडोली), प्रांजल तुळजाई (अवचारट्टी), भक्ती पाटील (कंग्राळी), सानिका कलखांब (हिरोजी), श्रावणी तरळे (आंबेवाडी) आणि अनुश्री चौगुले (अलतगा) यांचा समावेश आहे.
👮♀️ स्पर्धात्मक यशाचाही गौरव
कर्नाटक राज्य पोलीस दलाच्या उपनिरीक्षक (PSI) स्पर्धेत यश संपादन करून बेळगावचे नाव राज्यात उजळवणाऱ्या श्रुती पाटील यांचा देखील या सोहळ्यात विशेष सत्कार केला जाणार आहे.
🙌 समाजाचे आवाहन
अलीकडेच काडा अध्यक्षपदी निवड झालेल्या युवराज कदम यांचाही यावेळी सन्मान करण्यात येणार आहे.
या सर्व गौरव सोहळ्याला उपस्थित राहून नवोदित खेळाडूंना आणि स्पर्धात्मक क्षेत्रात यश मिळवणाऱ्या युवक-युवतींना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने किरण जाधव, प्रकाश मरगाळे, गुणवंत पाटील आणि नागेश देसाई यांनी केले आहे.

