बेळगाव :
दिल्ली येथील तालकटोरा आंतरराष्ट्रीय जलतरण तलावात दिनांक 12 ते 17 डिसेंबर दरम्यान आयोजित 69 व्या नॅशनल स्कूल गेम्स जलतरण स्पर्धेत बेळगावच्या कन्येने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
आबा हिंद स्पोर्ट्स क्लबची जलतरणपटू व जी. जी. चिटणीस स्कूलची विद्यार्थिनी कुमारी वेदा वैभव खानोलकर हिने कर्नाटक राज्याचे प्रतिनिधित्व करताना 4 x 100 मीटर मिडले रिले प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवत रौप्य पदकावर आपले नाव कोरले.
या यशामुळे बेळगाव शहरासह क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत पदक मिळवणे ही मोठी अभिमानाची बाब असून वेदाच्या मेहनतीचे आणि सातत्यपूर्ण सरावाचे हे फलित असल्याचे क्रीडा क्षेत्रातून बोलले जात आहे.
वेदा खानोलकर हिला या यशासाठी शाळेचे चेअरमन अॅड. चंद्रहास अनवेकर, प्राचार्या नविना शेट्टीगार, क्रीडा शिक्षक धनाजी सर यांचे मोलाचे प्रोत्साहन लाभले. तसेच आबा हिंद स्पोर्ट्स क्लबच्या अध्यक्षा शितल हुलभते, हिंदचे अध्यक्ष अरविंद संगोळी यांचा पाठिंबा लाभला.
तिच्या यशामागे एनआयएस मान्यताप्राप्त जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार यांचे तांत्रिक मार्गदर्शन आणि कठोर प्रशिक्षण महत्त्वाचे ठरले आहे. वेदाच्या या यशामुळे भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

