बेळगाव | प्रतिनिधी
भारतीय सेनेत अग्निवीर म्हणून निवड झाल्याबद्दल श्रींगारी कॉलनी, टीचर्स कॉलनी येथील तरुण समर्थ हानगोजी यांचा परिसरातील नागरिकांच्या वतीने गौरव करण्यात आला. देशसेवेची संधी मिळाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण पसरले होते.
टीचर्स कॉलनी, बाडीवाले कॉलनी व श्रींगारी कॉलनीतील नागरिकांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या सत्कार समारंभात कॉलनीतील महिलांनी समर्थ हानगोजी यांना शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरवले. तरुणांनी देशाच्या संरक्षणासाठी पुढे येणे ही अभिमानास्पद बाब असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या कार्यक्रमाला महिला ग्रुपच्या माधवी हिंडलगेकर, विजेता काकतीकर, पूनम चौधरी, गीता भस्मे, वंदना वर्णेकर, वैष्णवी डोंगरे, तृप्ती अर्कसाली, प्रधना बांदिवडेकर यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
समर्थ हानगोजी यांच्या या यशामुळे परिसरातील तरुणांमध्ये देशसेवेबाबत नवचैतन्य निर्माण झाले असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या.

