बेळगाव : दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या रायबाग व तालुक्यातील 39 तलावांना कृष्णा नदीतून पाणी उपलब्ध करून देण्याच्या महत्वाच्या योजनेला अखेर गती मिळाली आहे. बावनसौंदत्ती परिसरातून सुरू होणाऱ्या या कामांना 7 डिसेंबर रोजी औपचारिक प्रारंभ करण्यात येणार असल्याची माहिती लोकोपयोगी विभाग आणि जिल्हा पालक मंत्री सतीश जारकिहोळी यांनी दिली.
मंत्र्यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या प्रकल्पाची पायाभरणी 2013 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते झाली होती. मात्र प्रशासकीय कारणास्तव कामाला गती मिळू शकली नव्हती.
गेल्या काही महिन्यांत स्वतः स्थळ पाहणी करून, गुत्तेदारांना कामात गती आणण्याचे निर्देश दिल्यामुळे आज प्रकल्प प्रत्यक्षात सुरू होण्याच्या टप्प्यावर पोहोचल्याचे त्यांनी सांगितले.
याव्यतिरिक्त, चिक्कोडीच्या खासदार प्रियांका जारकिहोळी यांनीही कामाची प्रत्यक्ष पाहणी केली असून, प्रकल्प सुरळीत पार पडावा यासाठी पाठपुरावा केला आहे.
या योजनेमुळे रायबाग तालुक्यातील शेतकरी, ग्रामस्थ आणि जलस्रोतांवर अवलंबून असलेल्या हजारो नागरिकांची अनेक वर्षांची अपेक्षा पूर्ण होणार आहे.
प्रकल्प साकारण्यासाठी महावीर मोहिते यांच्या योगदानाचे विशेष कौतुक करताना मंत्री जारकिहोळी यांनी हे काम तालुक्याच्या जलसंपन्नतेसाठी महत्त्वाचा टप्पा ठरेल असा विश्वास व्यक्त केला.

