बेळगाव :
दिवाळीच्या सणात अनेक किल्ले उभारण्याची परंपरा आजही उत्साहाने जपली जाते. या परंपरेला लहानग्या कलाकारांनी नवा जीव दिला आहे. बेळगावातील मेलगे गल्लीतील केवळ सात वर्षांचा कुणाल विनायक कंग्राळकर याने यंदा बेळगाव मधील सुप्रसिद्ध ‘राजहंस गड’ या ऐतिहासिक किल्ल्याची अप्रतिम प्रतिकृती तयार करून सर्वांचे लक्ष वेधले आहे.
कुणाल सध्या वि. एन. शानभाग मराठी माध्यम शाळेत दुसरी इयत्तेत शिकत असून, इतिहास आणि छत्रपती शिवाजी महाराजांविषयी त्याला विशेष आकर्षण आहे. या आवडीमुळे त्याने राजहंस गडाची रचना अभ्यासून घरासमोर त्याची छोटी पण देखणी प्रतिकृती उभारली.
या किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, तटबंदी, बुरुज, आणि दरवाज्यांची रचना काळजीपूर्वक साकारण्यात आली आहे.
किल्ल्याच्या सजावटीसाठी त्याने माती, रंगीत कागद आणि प्लास्टिक व प्लास्टर ऑफ पॅरिसच्या छोट्या आकृत्यांचा वापर केला आहे.
दिवाळीच्या आनंदातही या लहान मेलगे इतिहासाची ओळख जपत आपली संस्कृती आणि वारसा जपण्याचा सुंदर संदेश दिला आहे.
कुणालच्या या कल्पकतेचे आणि मेहनतीचे बेळगावकरांकडून तसेच शिक्षक आणि पालकांकडून भरभरून कौतुक होत आहे.

