बेळगाव शहरातील शिवबसव नगर परिसरातील श्री जोतिबा मंदिरात चैत्र यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या बुधवार, 1 एप्रिल 2026 रोजी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी पहाटेपासून भक्तिमय वातावरणात धार्मिक विधी पार पडणार आहेत.
मंदिरात सकाळी 6 वाजता श्री जोतिबा देवांचा अभिषेक, पादपूजा, अलंकार पूजा आणि आरती होणार आहे. तसेच सायंकाळी 8 वाजता महाआरतीचे आयोजन करण्यात आले असून भाविकांना या धार्मिक सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
याशिवाय, कोल्हापूरहून देवदादा सासन काठीचे आगमन सोमवार, 6 एप्रिल 2026 रोजी होणार आहे. या निमित्ताने मंदिरात दुपारी 12 ते 4 या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
चैत्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात उत्साहाचे वातावरण असून भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित आहे.

