५ दशकांनंतर बेळगावला मानाचा कंठीरवा केसरी किताब
बेळगाव :
कंग्राळी खुर्द (ता. बेळगाव) येथील बाल हनुमान तालीम मंडळाचा आघाडीचा पैलवान कामेश पाटील (वय २२) याने म्हैसूर येथे झालेल्या राज्यस्तरीय दसरा कुस्ती स्पर्धेत चमकदार कामगिरी करत “कंठीरवा केसरी – २०२५” हा मानाचा किताब जिंकला आहे.
या विजयामुळे तब्बल पाच दशकांनंतर बेळगाव जिल्ह्याला कंठीरवा केसरी गदा मिळाली आहे. याआधी सत्तरच्या दशकात मुत्नाळ येथील हिंदकेसरी चंबा मुत्नाळ यांनी हा किताब जिंकून बेळगावचा मान वाढवला होता.
कामेश पाटीलने बाल हनुमान तालीम मंडळातून कुस्तीचा प्रवास सुरू केला असून सध्या तो महाराष्ट्रात उच्च शिक्षण घेत आहे. स्पर्धेत सुरुवातीपासूनच त्याने वर्चस्व राखत प्रतिस्पर्ध्यांना चित्तथरारक लढतीत पराभूत केले. विशेषत: अंतिम सामन्यात प्रतिस्पर्ध्याला संधी न देता त्याने विजय संपादन करत इतिहास घडवला.
कामेशच्या या पराक्रमामुळे बेळगाव जिल्ह्यात आणि कंग्राळी खुर्द गावात उत्साहाचे वातावरण असून सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

