बेळगाव (प्रतिनिधी) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त रांगोळी कलाकार अजित औरवाडकर यांनी पाण्यातील रांगोळीच्या माध्यमातून बाबासाहेबांचे प्रभावी भावचित्र साकारत अनोख्या पद्धतीने अभिवादन केले.
वडगाव येथील ज्योती फोटो स्टुडिओमध्ये साकारण्यात आलेल्या या रांगोळीत कृष्ण-धवल रंगसंगतीचा वापर करून बाबासाहेबांचे व्यक्तिमत्त्व जिवंत केले आहे. विशेष म्हणजे ही रांगोळी पाण्याच्या पृष्ठभागावर साकारण्यात आली असून ती पाहणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
या कलाकृतीसाठी सुमारे सहा तासांचा कालावधी लागला. या माध्यमातून कलाकाराने बाबासाहेबांनी दिलेला ‘शिका, संघटित रहा आणि संघर्ष करा’ हा संदेश प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
जयंतीनिमित्त अशा कलात्मक उपक्रमांमुळे समाजात प्रेरणा आणि जागृती निर्माण होत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

