बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील शाहुनगर भागातील डोंबारी समाजाच्या पारंपरिक स्मशानभूमीवर स्थानिक प्रभावशाली व्यक्तींनी अतिक्रमण केल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे. या प्रकरणी संतप्त झालेल्या दलित संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी आज दलीत नेते मल्लेश चौगुले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत प्रशासनाकडे तातडीच्या कारवाईची मागणी केली.
https://youtube.com/shorts/npbJIvNfKXc?si=PtA_d88BcC94fZ7P
मिळालेल्या माहितीनुसार, खानापूर येथील सर्व्हे क्रमांक ९३/ए १ मधील जागा सुमारे तीनशे वर्षांपासून डोंबारी समाजाच्या अंत्यसंस्कारासाठी वापरली जात आहे. मात्र, काही काळापासून बंद असलेल्या एका खासगी कंपनीच्या नावाचा आधार घेत काही धनदांडग्यांनी या जागेतील झाडांची तोड करून मृतांच्या थडग्यांवरच बांधकाम सुरू केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
ही जागा महसूल अभिलेखात अधिकृतपणे डोंबारी समाजाच्या नावे नोंदवावी, तसेच परिसरातील सर्व अनधिकृत बांधकामे तात्काळ हटवून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.
जिल्हा संघटक राजशेखर हिंडलगी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “जिवंतपणी सामाजिक उपेक्षा सहन करणाऱ्या या समाजाला मृत्यूनंतरही सन्मानाने अंत्यसंस्काराची जागा न मिळणे, ही अत्यंत वेदनादायक बाब आहे. प्रशासनाने त्वरीत सखोल चौकशी करून न्याय दिला नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.”
आंदोलकांच्या निवेदनानुसार, खानापूर तहसीलदार आणि नगरपंचायतीकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत. उलट अतिक्रमण करणाऱ्यांनी न्यायालयाची दिशाभूल करून आणि पोलीस संरक्षणाच्या आधारे जागेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या आंदोलनात डोंबारी समाजाचे बांधव, दलित संघर्ष समितीचे पदाधिकारी आणि विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

