बेळगाव महानगरपालिकेच्या प्रशासकीय बैठकीत शहरातील मूलभूत सुविधांवरील प्रश्नांवरून नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरल्याचे चित्र पाहायला मिळाले. महापौर प्रीती कामकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत रखडलेली विकासकामे, ड्रेनेजची दुरवस्था आणि वीज यंत्रणेतील त्रुटी यावर सविस्तर चर्चा झाली.
बैठकीच्या सुरुवातीलाच नगरसेविका रेश्मा भैरकदार यांनी ड्रेनेज समस्येवर तीव्र नाराजी व्यक्त केली. वारंवार तक्रारी करूनही अधिकाऱ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर वाहत असून, पावसाळ्यात परिस्थिती अधिक बिकट होत असल्याचे त्यांनी सांगितले.
नगरसेवक रियाज किल्लेदार यांनी मन्नत कॉलनीतील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर महापौरांनी अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी जाऊन समस्या सोडवण्याचे आदेश दिले.
वीज पुरवठा आणि स्मार्ट सिटी प्रकल्पांबाबतही बैठकीत जोरदार चर्चा झाली. नगरसेवक राजू भातकांडे यांनी प्रभागात उभारण्यात येणारे ओव्हरहेड पोल अद्याप प्रलंबित असल्याची बाब मांडली. तसेच कामादरम्यान काढलेले पोल पुन्हा बसवण्यात होत असलेल्या विलंबाबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
हेस्कॉमच्या कामकाजावर टीका करत झाडांच्या फांद्या तोडून कचरा तसाच टाकला जात असल्याचेही निदर्शनास आले. नगरसेवक रवी साळुंके यांनी वॉर्डनिहाय विशेष पथक स्थापन करण्याची मागणी केली.
दरम्यान, वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर महापालिकेची हेल्पलाईन प्रभावी नसल्याचा मुद्दा नगरसेविका वीणा विजापूरे आणि राजशेखर ढोणी यांनी उपस्थित केला.
२०१६ पासून प्रलंबित असलेल्या भूमिगत केबल्सच्या कामावरून नगरसेवक रवी धोत्रे आणि संदीप जिरग्याळ यांनी प्रशासनावर टीका केली. बहुतांश काम पूर्ण झाल्यानंतरही उर्वरित काम रखडल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.
एल अँड टी कंपनीच्या कामामुळे सिडी वर्कचे नुकसान होऊन काही भागात पाणी साचत असल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान होत असल्याचा मुद्दा जयतीर्थ सवदत्ती यांनी उपस्थित केला.
राष्ट्रीय महामार्गालगतचे खड्डे आणि नागरी सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल स्थायी समिती अध्यक्षा लक्ष्मी राठोड आणि सदस्य दिनेश नाशिपुडी यांनीही नाराजी व्यक्त केली.
अखेर महापौरांनी सर्व तक्रारींची दखल घेत प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आणि संबंधित विभागांनी कार्यवाही अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.
या बैठकीला उपमहापौर हनुमंत कोंगाळी, सत्ताधारी पक्ष नेते संतोष पेडणेकर, विरोधी पक्ष नेते सोहेल सांगोली यांच्यासह सर्व प्रभागांतील नगरसेवक आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

