पंचधातुपासून तयार करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचा आगमन सोहळा हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत उत्साही वातावरणात पार पडला.पिरनवाडी गावात या पुतळ्याची प्रतिष्ठापना केली जाणार आहे.झान्ज पथक, मर्दानी खेळांचे पथक महिलांचे लेझीम पथक, वारकरी भजनी महिला मंडळ आणि इस्कॉन भजन पथकाचा आगमन सोहळ्याच्या मिरवणुकीत सहभाग होता.
छत्रपती शिवाजी उद्यान येथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या आगमन सोहळ्याला प्रारंभ झाला. भगवे फेटे परिधान केलेले तरुण, तरुणी मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते. भगव्या साड्यातील महिलांची संख्याही लक्षणीय होती.
पुतळ्याच्या मिरवणुकीच्या मार्गांवर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.मर्दानी खेळाच्या पथकाने प्रात्यक्षिके सादर करून शिवप्रेमी कडून दाद मिळवली. आगमन सोहळ्याच्या मिरवणुकीच्या वेळी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात आला होता.

