गोव्यात बेळगावचा झेंडा उंचावल; आरशान माडीवालेची दुहेरी कांस्य कामगिरी
गोवा येथे पार पडलेल्या निमंत्रित रोलर स्केटिंग स्पर्धेत बेळगावच्या युवा स्केटर आरशान माडीवाले याने उल्लेखनीय कामगिरी करत दोन कांस्य पदकांची कमाई केली. या स्पर्धेत सुमारे ४०० हून अधिक आघाडीचे स्केटर्स सहभागी झाले होते. कठीण आणि स्पर्धात्मक वातावरणात आरशानने सातत्यपूर्ण खेळ करत बेळगावचे नाव उज्ज्वल केले.
ही स्पर्धा गोव्यातील विविध राज्यांतील अव्वल स्केटर्सच्या उपस्थितीत रंगली. स्पर्धेतील उच्च दर्जाच्या खेळाडूंमध्ये आरशानने दाखवलेली जिद्द आणि वेग कौतुकास्पद ठरली.
आरशान सध्या केएलई सोसायटी स्केटिंग रिंक, गुड शेफर्ड स्केटिंग रिंक तसेच शिवगंगा स्पोर्ट्स क्लब येथे नियमित सराव करत आहे. प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, विठ्ठल गंगणे, योगेश कुलकर्णी, विश्वनाथ येल्लूरकर आणि सोहम हिंडलगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याची तयारी सुरू आहे.
त्याला डॉ. प्रभाकर कोरे, माजी आमदार शाम घाटगे, राज घाटगे, उमेश कलघटगी आणि प्रसाद तेंडुलकर यांचे प्रोत्साहन लाभत असून या यशाबद्दल क्रीडावर्तुळातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या वतीनेही आरशानचे कौतुक करण्यात आले आहे. या यशामुळे बेळगावच्या क्रीडा क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

