बेळगाव :क्रीडा क्षेत्रातील दीर्घ, समर्पित आणि प्रभावी योगदानाची दखल घेत कर्नाटक सरकारतर्फे बेळगावचे प्रख्यात स्विमिंग प्रशिक्षक उमेश जी. कलघाटगी यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. बेंगळुरू येथे झालेल्या भव्य समारंभात मुख्यमंत्री श्री. सिद्धरामय्या यांच्या हस्ते हा मानाचा सन्मान प्रदान करण्यात आला.
मागील २४ वर्षांपासून श्री. कलघाटगी यांनी केवळ प्रशिक्षक म्हणून नाही, तर समाजातील वंचित आणि दिव्यांग मुलांसाठी मार्गदर्शक, आधार आणि प्रेरणास्त्रोत म्हणून काम केले आहे. स्विमर्स क्लब बेळगाव आणि अॅक्वेरियस स्विम क्लबच्या माध्यमातून त्यांनी शारीरिकदृष्ट्या अपंग, बौद्धिकदृष्ट्या अपंग, दृष्टिहीन, श्रवणहीन तसेच अनाथ मुलांना पूर्णपणे विनामूल्य प्रशिक्षण, वाहतूक, क्रीडा साहित्य आणि आहार उपलब्ध करून दिला.
त्यांच्या प्रशिक्षणातून ९ आंतरराष्ट्रीय जलतरणपटू, तसेच शेकडो राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय खेळाडू घडले आहेत. या खेळाडूंनी मिळून ६० हून अधिक आंतरराष्ट्रीय पदके आणि हजारो राष्ट्रीय-राज्य पदके पटकावली आहेत. प्रशिक्षक कलघाटगी यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले काही मानकरी म्हणजे – राष्ट्रपती पुरस्कार विजेते, चार एकलव्य पुरस्कार विजेते, कर्नाटक राज्योत्सव पुरस्कार विजेते, तसेच ऑंड्रू स्कॉट पुरस्कार प्राप्त युवा जलतरणपटू, ज्याने लंडनमध्ये सर्वात कमी वयात इंग्लिश चॅनेल पोहून दाखवला.
खेळाडू घडवण्याबरोबरच अनेकांना सरकारी तसेच खाजगी क्षेत्रात स्थिर रोजगार मिळवून देण्याचे कार्यही त्यांनी यशस्वीरीत्या केले आहे. स्वतःही आंतरराष्ट्रीय स्तरावर सहा वेळा भारताचे प्रतिनिधित्व करून देशाचा गौरव त्यांनी वाढवला आहे.
श्री. कलघाटगी यांच्या अतुलनीय सेवेला डॉ. प्रभाकर कोरे, श्री. जयंत हुंबरवाडी, निवृत्त अविनाश पोतदार, श्री. गोपाल होसूर, श्री. दिलीप चिटणीस, श्री. शिरीष गोगटे, एसएलके ग्रुप, मानेक कपाडिया, लता कित्तूर, डॉ. नितीन खोत आणि अनेक मान्यवरांनी अभिनंदनपर संदेश पाठवले आहेत.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांनी सांगितले,“बेळगावच्या जनतेने दिलेला पाठिंबा हे माझे बळ आहे. पुढेही समाजातील प्रत्येक मुलाला क्रीडेद्वारे सक्षम करण्याचे कार्य सुरूच राहील.”
उमेश कलघाटगी यांचा प्रवास हे सेवाभाव, चिकाटी आणि मानवी संवेदनेचे प्रेरणादायी उदाहरण आहे.

