बेळगाव: खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025 मध्ये बेलगाव जिल्ह्याची प्रतिभावान जूडोपटू भुमिका व्ही. एन. हिने प्रभावी कामगिरी करत कांस्यपदक जिंकून राज्याचे आणि जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल केले आहे. 24 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरदरम्यान उदयपूर येथे सुरू असलेल्या या प्रतिष्ठेच्या क्रीडा महोत्सवात भुमिकाने +78 किलो वजन गटात दमदार प्रदर्शन नोंदवले.
भुमिका व्ही. एन. ही राणी चन्नम्मा विद्यापीठ, कर्नाटकच्या जूडो संघाचे प्रतिनिधित्व करत असून तिने संपूर्ण स्पर्धेत आत्मविश्वास, तंत्र आणि क्रीडाभावाची उत्तम सांगड घातली. तिच्या विजयामुळे आरसीयूच्या क्रीडा विभागालाही नवी उर्जा मिळाली आहे.
राष्ट्रीय स्पर्धांबरोबरच भुमिकाचे आंतरराष्ट्रीय स्तरावरही उल्लेखनीय योगदान आहे. 2024 मध्ये तिने कझाकस्तान आणि हाँगकाँग येथे झालेल्या एशियन ओपन जूडो चँपियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्याशिवाय वीमेन्स जूडो लीग – केरळमध्ये तिने राष्ट्रीय सुवर्णपदक मिळविले असून दिल्लीतील वरिष्ठ राष्ट्रीय जूडो स्पर्धेत रौप्यपदक जिंकून ती राज्यातील आघाडीच्या जूडोपटूंमध्ये गणली जाते.
सध्या भुमिका, जिल्हा क्रीडांगण बेलगाव येथे प्रसिद्ध प्रशिक्षिका रोहिणी पाटील आणि कुतुजा मुळतानी यांच्या मार्गदर्शनाखाली कठोर प्रशिक्षण घेत आहे. तिच्या प्रगतीत DYES चे उपसंचालक श्री. श्रीनिवास सर यांचा सातत्यपूर्ण पाठिंबा महत्त्वाचा ठरला आहे.
भुमिकाच्या या यशामुळे बेलगावातील तरुण क्रीडापटूंना प्रेरणा मिळाली असून स्थानिक क्रीडा क्षेत्रातही तिच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

