बेळगाव | प्रतिनिधी
बेळगाव जिल्हा क्रीडा कराटे संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 6व्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत बेळगावच्या कृष्णा देवगाडी याने दमदार आणि कौशल्यपूर्ण खेळ सादर करत ‘ओपन चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ हा प्रतिष्ठेचा किताब पटकावला आहे.
दि. 20 व 21 डिसेंबर 2025 रोजी येथील के.पी.टी.सी.एल. समुदाय भवन, शिवबसव नगर येथे पार पडलेल्या या स्पर्धेत देशभरातील पंजाब, हरियाणा, दिल्ली, तामिळनाडू, महाराष्ट्र, गोवा यांसह विविध राज्यांमधील 1200 हून अधिक कराटेपटूंनी सहभाग नोंदवला होता.
अत्यंत चुरशीच्या लढतींमध्ये कृष्णा देवगाडी याने सातत्यपूर्ण कामगिरी करत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली आणि अंतिम फेरीत विजय मिळवून ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’चा बहुमान मिळवला. या उल्लेखनीय यशाबद्दल त्याला ₹25,000 रोख बक्षीस आणि स्मृतिचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले.
कृष्णा देवगाडी याला कराटे प्रशिक्षक निलेश गुरखा यांचे मोलाचे प्रशिक्षण लाभले असून, बेळगाव जिल्हा क्रीडा कराटे संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र काकतीकर आणि सचिव जितेंद्र काकतीकर यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन मिळत आहे.
या यशामुळे बेळगावच्या कराटे क्षेत्राचा नावलौकिक राष्ट्रीय पातळीवर वाढला असून, कराटे संघटना, प्रशिक्षक तसेच क्रीडाप्रेमींनी कृष्णा देवगाडी याचे अभिनंदन केले आहे.

