बी.के. मॉडेल हायस्कूल शताब्दी महोत्सवाचा आज प्रारंभ:
बेळगाव: शिक्षणाची गौरवशाली परंपरा जपणा-या बेळगाव एज्युकेशन सोसायटीच्या 'बी.के. मॉडेल हायस्कूल'ने आपल्या यशस्वी वाटचालीची १०० वर्षे पूर्ण केली आहेत. या ऐतिहासिक शतकोत्सवाचे औचित्य साधून आयोजित विविध कार्यक्रमांची सुरुवात उद्या शुक्रवार दि. १९ डिसेंबर रोजी सायं. ५:३० वा. सुप्रसिद्ध विनोदी कलाकार श्री. गंगावती प्राणेश यांच्या बहारदार कार्यक्रमाने होणार आहे.
सुमारे एक शतकापूर्वी, २ फेब्रुवारी १९२५ रोजी सात ध्येयवेड्या तरुण शिक्षकांनी एका भाड्याच्या खोलीत 'मॉडेल इंग्लिश स्कूल'ची स्थापना केली होती. आज या संस्थेचा वटवृक्ष झाला असून, सात विविध शैक्षणिक शाखांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी येथे घडत आहेत. संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश पोतदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या शताब्दी महोत्सवाची नांदी या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाने होईल.
विनोदवीर असलेल्या आणि आपल्या खुसखुशीत शैलीने समाजप्रबोधन करणारे गंगावती प्राणेश आपल्या विनोदातून जीवनातील विसंगतीवर मार्मिक बोट ठेवणारा कार्यक्रम सादर करतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असल्याने संस्थेच्या आजी-माजी विद्यार्थी व इतर चिंतकासह नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अविनाश पोतदार यांनी केले आहे.

