छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी कंग्राळी बुद्रुक ग्रामस्थांचा एकजुटीचा पुढाकार — 1995-96 च्या बॅचनं दिली देणगी
बेळगाव तालुक्यातील कंग्राळी बुद्रुक गावात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाचे बांधकाम उत्साहात सुरू असून, या ठिकाणी लवकरच छत्रपती संभाजी महाराजांची भव्य मूर्ती उभारण्यात येणार आहे.
या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी उपक्रमाला गावकऱ्यांसह विविध सामाजिक घटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
गावातील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या 1995-96 च्या माजी विद्यार्थ्यांनी समाजातील बांधिलकी जपत तब्बल पंचवीस हजार रुपयांची देणगी देऊन या कार्यास मोलाचे सहकार्य केले आहे. ही देणगी बाल संभाजी युवक मंडळाच्या अध्यक्षांकडे सुपूर्द करण्यात आली.
छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचे काम सध्या जोरात सुरू असून, मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून दिवस-रात्र परिश्रम घेतले जात आहेत. गावातील तरुणांनी समाज आणि इतिहासाची जाणीव जपत हा उपक्रम उभारला आहे.
या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात सर्वांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेचा स्मरण करून त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.

