बेळगाव | प्रतिनिधी
बेळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशन (BDFA) मध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या गैरव्यवहार, निधीतील अनियमितता आणि पारदर्शकतेअभावी फुटबॉल क्लबचे पदाधिकारी, प्रशिक्षक आणि खेळाडू एकत्र येऊन आवाज उठवत आहेत.
गणाधीश हॉल, बेळगाव येथे BDFA ची वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) आयोजित करण्यात आली होती. मात्र बैठकीदरम्यान अनपेक्षित प्रकार घडला. काही क्लब प्रतिनिधींना “पात्र नाहीत” या कारणावरून सभागृहात प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले. सभागृहाबाहेर थांबवण्यात आलेल्या सदस्यांनी हे “अलोकशाही वर्तन” असल्याचा आरोप केला.
क्लब प्रतिनिधींचा आरोप आहे की, BDFA मध्ये गेल्या 14 वर्षांपासून तेच पदाधिकारी कार्यरत आहेत, जे Karnataka State Football Association (KSFA) च्या नियमांच्या विरोधात आहे. KSFA च्या संविधानानुसार अध्यक्षपदाचा कार्यकाळ जास्तीत जास्त 12 वर्षांचा असू शकतो. तरीही तो नियम मोडून सत्ता टिकवून ठेवली जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
क्लब प्रतिनिधींनी मांडलेल्या मुख्य मुद्द्यांमध्ये —
₹9.25 लाख रुपयांची अनधिकृत रक्कम काढणे,
2023-24 लोकमान्य ट्रॉफीच्या विजेत्यांना ₹1.50 लाख बक्षीस न देणे,
दोन वर्षांपासून वार्षिक सभा न घेणे,
आणि ऑडिट रिपोर्ट 21 दिवस आधी न देणे,
अशा गंभीर अनियमिततेच्या बाबींचा समावेश आहे.
काही सदस्यांनी सांगितले की, ऑडिट रिपोर्ट केवळ WhatsApp ग्रुपवर पाठवण्यात आला, जे KSFA च्या नियमानुसार अमान्य आहे. तसेच, फ्रीज असलेल्या खात्यातून ₹5.28 लाखांची रक्कम अन्य खात्यावर हस्तांतरित करण्यात आली, असा आरोपही करण्यात आला आहे.
2023 मध्ये झालेल्या ज्युनियर नॅशनल फुटबॉल टूर्नामेंटदरम्यान आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे उघड झाल्यानंतर KSFA ने 4 जून 2025 रोजी BDFA ला निलंबित केले होते आणि 5 जुलैपर्यंत नव्या निवडणुकीचे आदेश दिले होते. मात्र हा निर्णय नंतर अचानक मागे घेण्यात आला.
https://youtu.be/UlMQapuHxsg?si=H2NhJm3Rzl32VSP3
याच पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा AGM आयोजित करण्यात आले, पण त्यातही नियमभंग झाल्याचा आरोप होत आहे. क्लब प्रतिनिधी प्रणय शेट्टी व क्लबचे पदाधिकारी यांनी या “बेकायदेशीर” सभेचा निषेध नोंदवत वॉकआउट केला.

