बेळगाव:
1 नोव्हेंबर 2023 रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने बेळगावात काळा दिवस पाळण्यात आला होता. संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या मूक सायकल फेरीदरम्यान घोषणाबाजी आणि भाषिक तेढ निर्माण केल्याचा आरोप कार्यकर्त्यांवर ठेवण्यात आला होता.
या घटनेप्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 142, 147, 153, 290 आणि 149 अंतर्गत एकूण 14 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला होता.
या प्रकरणातील CC क्रमांक 2917/2024 अंतर्गत चालू असलेल्या खटल्यात JMFC कोर्ट क्रमांक 2, बेळगाव यांनी आज नऊ कार्यकर्त्यांना सशर्त जामीन मंजूर केला आहे.
कोर्टाने ज्या कार्यकर्त्यांना जामीन मंजूर केला त्यामध्ये —
मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, अंकुश केसरकर, रवी साळुंखे, वैशाली भातखांडे, गजानन पाटील, शिवाजी सुंठकर, नेताजी जाधव आणि विकास कलघटगी — यांचा समावेश आहे.
या प्रकरणाची पुढील सुनावणी 18 डिसेंबर 2026 रोजी निश्चित करण्यात आली आहे.
या खटल्यात बचाव पक्षाच्या वतीने ॲड. महेश बिर्जे, ॲड. बालासाहेब कागणकर, ॲड. एम. बी. बोंद्रे, ॲड. वैभव कुट्रे आणि ॲड. अश्वजीत चौधरी यांनी काम पाहिले.
जामीन प्रक्रियेसाठी माजी नगरसेवक मनोहर हलगेकर यांनी जमीनदार म्हणून उपस्थिती दर्शवली.
या निर्णयामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला असून, पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

