काँग्रेस नेते युवराज कदम यांची काडा अध्यक्षपदी नियुक्ती
बेळगाव : राज्य सरकारने बेळगाव ग्रामीण भागातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते युवराज कदम यांची कर्नाटक मलप्रभा-घटप्रभा (काडा) महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्यांच्या या निवडीमुळे ग्रामीण भागात काँग्रेसने मराठा समाजाला नवे नेतृत्व दिल्याचे मानले जात आहे.
युवराज कदम हे बेळगावच्या उचगाव परिसरातील अनुभवी नेते असून, यापूर्वी त्यांनी नगरविकास प्राधिकरण (BUDA) तसेच एपीएमसीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. दीर्घ राजकीय कारकिर्दीत त्यांनी विविध पदांवर कार्य करताना ग्रामीण भागातील प्रश्नांना प्राधान्य दिले होते.
काँग्रेस पक्षाने त्यांना काडाच्या अध्यक्षपदी नेमल्यामुळे आगामी काळात ग्रामीण भागातील विकासाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यांच्या नियुक्तीची अधिकृत अधिसूचना सरकारतर्फे बजावण्यात आली असून, पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

