बेळगांव :शहरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या वाहतूक कोंडी व अपघातांच्या पार्श्वभूमीवर, शहराच्या अंतर्गत भागात अवजड वाहनांच्या मुक्त संचारावर तात्काळ निर्बंध घालावेत, अशी जोरदार मागणी कर्नाटक राज्य रयत संघ (मानव हक्क व भ्रष्टाचार निर्मूलन समिती) उत्तर कर्नाटक राज्याध्यक्ष गंगाधर रमेश दोडमणी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.
शाळा सुरू होण्याच्या व सुटण्याच्या वेळेत मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची शहरात ये-जा होत असल्याने शाळकरी मुले, पालक, महिला व सर्वसामान्य नागरिकांना गंभीर धोका निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असून नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे, अशी तक्रार निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनात स्पष्ट करण्यात आले की, नागरिकांचा सुरक्षित व निर्भयपणे वावरण्याचा मूलभूत हक्क धोक्यात येत असून, प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे. विशेषतः सकाळी शाळा सुरू होण्याच्या आणि दुपारी सुटण्याच्या वेळेत शहराच्या अंतर्गत मार्गांवर अवजड वाहनांना प्रवेशबंदी लागू करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
या विषयावर प्रशासनाने योग्य निर्णय न घेतल्यास, संघटनेच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी प्रदीप गोपाल भुतिया, संजय कौजलगी, मुन्नावर जमादार, व्यंकटेश रेवणकर, कन्नप्पा पुजारी, ए.ए. नाईकवाडी, शेर अली नदाफ, मन्सूर लेखन, रुद्रय्या हिरेमठ तसेच अॅड. शाहूराज लोहार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

