जागतिक स्केटिंग स्पर्धेसाठी देवेन बामणेची निवड — डॉ. प्रभाकर कोरे यांच्या हस्ते सत्कार
बेळगाव :
भारतीय रोलर स्केटिंग महासंघ, कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशन व बेळगाव डिस्ट्रिक्ट रोलर स्केटिंग असोसिएशनचा प्रतिभावान स्केटर देवेन बामणे याची जागतिक फ्री स्टाईल रोलर स्केटिंग स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. ही प्रतिष्ठित स्पर्धा येत्या डिसेंबर महिन्यात सिंगापूर येथे पार पडणार आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल देवेनचा के.एल.ई. सोसायटीचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. डॉ. कोरे यांनी देवेनला आगामी स्पर्धेसाठी शुभेच्छा देत त्याच्या प्रशिक्षणासाठी आवश्यक त्या सर्व मदतीचे आश्वासन दिले.
देवेन सध्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी जोमाने सराव करत असून, त्याच्या या प्रयत्नामुळे बेळगावचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उजळणार आहे.
या कार्यक्रमाला स्केटिंग प्रशिक्षक सुर्यकांत हिंडलगेकर, देवेनचे पालक विनोद बामणे व ज्योती बामणे, तसेच बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे सदस्य, स्केटर्स व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

