बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथ यांच्या वतीने बेळगाव तालुक्यातील शासकीय वरिष्ठ कन्नड/उर्दू प्राथमिक शाळा, मोदगा येथे शिकणाऱ्या सर्व 160 विद्यार्थ्यांना मोफत स्वेटर समवस्त्रांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे थंड हंगामात विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून शिक्षणासाठी सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनील मराठे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात, विद्यार्थ्यांच्या शिक्षण व आरोग्याच्या दृष्टीने सातत्याने योगदान देणाऱ्या रोटरी क्लबच्या सर्व सदस्यांचे आभार मानले.
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथचे अध्यक्ष डॉ. गोविंद मिसाळे यांनी विद्यार्थ्यांना स्वेटरचे वितरण करताना, “कोणत्याही परिस्थितीत शिक्षण अर्धवट सोडू नये. शिक्षण हेच खरे बळ असून तेच उज्ज्वल भविष्यासाठी मार्ग दाखवते,” असा संदेश दिला.
यावेळी क्षेत्र शिक्षणाधिकारी अंजनय्यालू आर. के. यांनी विद्यार्थ्यांनी मिळालेल्या स्वेटरचा योग्य वापर करून अभ्यासात प्रगती साधावी, असा सल्ला दिला.
रोटेरियन नागरराज नाशी यांनी रोटरी क्लब विविध समाजोपयोगी उपक्रमांद्वारे शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत असल्याचे सांगत, “शिक्षणामुळेच देशाची प्रगती शक्य आहे. प्रत्येकाने शिक्षण घेऊन जबाबदार नागरिक व्हावे,” असे मत व्यक्त केले.
याच कार्यक्रमात मोदगा शासकीय कन्नड वरिष्ठ प्राथमिक शाळा, आर.डी. हायस्कूल मारीहाळ आणि निर्मल हायस्कूल, निर्मलनगर येथील आई किंवा वडील गमावलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी २,००० रुपयांची शैक्षणिक मदतीची धनादेश देण्यात आली. स्वेटर, गोड पदार्थ आणि शैक्षणिक मदत मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला.
कार्यक्रमास रोटेरियन प्रणव पित्रे, नागराज नाशी, आरती अंगडी, प्रीती पाटील, सविनय शिवनगौडर, अजय भाटिया, एसडीएमसी सदस्य नागेंद्र दानोजी, परशुराम पोणजी, सुभान यरगट्टी, मोहम्मद हुसेन हसनळी, उर्दू शाळेचे एसडीएमसी अध्यक्ष रियाज अहमद हिरेकोडी, मुख्याध्यापक जी. एस. पाटील तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते.
व्ही. एस. अल्लैय्यनवरमठ यांनी स्वागत केले, बी. एम. तहसीलदार यांनी आभार मानले, तर सूत्रसंचालन आर. बी. सोगळी यांनी केले.

