बेळगावात जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धा जल्लोषात संपन्न
बेळगाव :
बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या वतीने आयोजित १९ वी जिल्हास्तरीय स्पीड स्केटिंग स्पर्धा व निवड चाचणी २०२५ नुकतीच उत्साहात पार पडली. रोड आणि रिंक या दोन प्रकारात झालेल्या या स्पर्धांना जिल्ह्यातील सुमारे १५० हून अधिक स्केटर्सनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
रोड स्पर्धेचे आयोजन मालिनी सिटी येडियुरप्पा मार्ग (ओल्ड पी. बी. रोड) येथे तर रिंक स्पर्धा शिवगंगा स्पोर्ट्स क्लब स्केटिंग रिंक येथे करण्यात आली होती.
कार्यक्रमाचे उद्घाटन बसवेश्वर बँकेचे अध्यक्ष व समाजसेवक श्री. सतीश पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, विश्वनाथ येल्लूरकर, सुरज शिंदे यांच्यासह अनेक पालक व खेळाडू उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगी श्री. पाटील यांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यांनी आपल्या भाषणात स्केटर्सना प्रोत्साहन देत सांगितले की, “बेळगाव शहरात लवकरच सुसज्ज स्केटिंग ट्रॅक आणि क्रीडा सुविधांचा विकास करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जातील.”
या स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी प्रशिक्षक योगेश कुलकर्णी, विशाल वेसने, विठ्ठल गंगणे, सोहम हिंडलगेकर, सागर तरळेकर आणि ऋषीकेश पसारे, स्वरूप पाटील यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
या निवड चाचणीद्वारे राज्यस्तरीय स्पर्धांसाठी पात्र खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे.

