बेळगाव :
समगार (चर्मकार) हरळय्या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्यात यावे, या प्रमुख मागणीसह समाजाच्या विविध प्रश्नांबाबत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नावे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना निवेदन सादर करण्यात आले. शुक्रवारी (दि. १९) समाजनेत्यांनी हे निवेदन दिले.
चामड्यापासून पादत्राणे निर्मिती हा समगार हरळय्या समाजाचा पारंपरिक व मुख्य व्यवसाय असून, राज्यात या समाजाची लोकसंख्या लक्षणीय आहे. मात्र अद्याप स्वतंत्र महामंडळ नसल्याने समाजाच्या विकासाला मर्यादा येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. त्यामुळे समगार समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करून त्याला स्वतंत्र निधी मंजूर करावा, अशी ठाम मागणी करण्यात आली.
यासोबतच शिवशरण हरळय्या यांच्या नावाने गुरुपीठ स्थापन करण्यासाठी बेळगाव, हुबळी, विजापूर आणि बेंगळूर शहरात जागा मंजूर करावी, अशी मागणी समाजनेत्यांनी केली. तसेच लिडकर महामंडळावर समगार समाजातील व्यक्तीची अध्यक्ष किंवा समकक्ष पदावर नेमणूक करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
बेंगळूरमधील नागरभावी येथे बीडीएमार्फत मंजूर जागेवर शिवशरण हरळय्या भवन व कौशल्यविकास केंद्र उभारण्यासाठी निधी मंजूर करावा. याशिवाय राज्याच्या विविध भागात उभारण्यात आलेल्या समगार हरळय्या, कल्याणम शीलवंत व समगार भीमव्वा स्मारकांच्या विकासासाठी अनुदान द्यावे, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
तसेच चर्मकार बांधवांसाठी कामासाठी शेड, आयुर्विमा, घरे यांसारख्या कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी समाजनेत्यांनी केली. निवेदन सादर करताना समगार हरळय्या समाजातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

