बेळगावातील ज्येष्ठ नाट्यकर्मी अनंतराव जांगळे यांच्या निधनानंतर शहरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या स्मरणार्थ हिंदवाडी येथील हिंद हाउसिंग सोसायटीच्या कार्यालयात आयोजित शोकसभेत विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
या शोकसभेच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार गुरुवर्य Parashuram Bhau Nandihalli होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी अनंतराव जांगळे यांनी सामाजिक, सांस्कृतिक आणि सहकार क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा गौरव केला. “जांगळे यांचे कार्य विविध अंगांनी प्रेरणादायी आहे. त्यांच्या आयुष्याचा आणि कार्याचा आढावा घेणारा ग्रंथ प्रकाशित व्हावा; त्यासाठी मी सर्वतोपरी सहकार्य करेन,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला नंदीहळळी आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जांगळे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी आपल्या आठवणी आणि भावना व्यक्त केल्या.
पायोनियर बँकेचे संचालक अनंत लाड यांनी प्रास्ताविक करताना जांगळे यांच्या कार्यातील सातत्य, निष्ठा आणि प्रामाणिकपणावर प्रकाश टाकला. जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष लक्ष्मण शिंदे यांनी “जायंट्सच्या प्रत्येक उपक्रमात सक्रिय सहभाग घेणारे जांगळे हे मितभाषी पण प्रभावी कार्यकर्ते होते,” असे सांगितले.
दैवज्ञ बँकेचे उपाध्यक्ष मंजुनाथ शेठ यांनी त्यांच्या शांत स्वभावाची आणि हिंद सोशल क्लब तसेच स्पोर्ट्स क्लबमधील योगदानाची आठवण करून दिली. सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष नेताजी जाधव यांनी त्यांना ‘अजातशत्रू’ संबोधत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. तुकाराम बँक आणि मराठा समाज सुधारणा मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी १९९५ पासूनचा सहवास आठवत त्यांच्या प्रामाणिक स्वभावाचा उल्लेख केला.
जायंट्स सखीच्या अध्यक्षा सुलक्षणा शिरोळकर, बसवेश्वर बँकेच्या संचालिका सरला हेरेकर, शिवराज पाटील, मदन बामणे, श्रीकांत काकतीकर, डॉ. विनोद गायकवाड, ईश्वर लगाडे यांसह अनेकांनी श्रद्धांजली अर्पण केली.
कुटुंबीयांपैकी सून अमृता अभिजीत जांगळे यांनी “त्यांनी आम्हाला सून म्हणून नव्हे तर मुलगी म्हणून जपले,” अशा भावनिक शब्दांत आठवणी व्यक्त केल्या. चिरंजीव अभिजीत जांगळे यांनी वडिलांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचा आणि त्यांचे सामाजिक कार्य पुढे चालू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या शेवटी दोन मिनिटे शांतता पाळून दिवंगत अनंतराव जांगळे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जायंट्स ग्रुप, तुकाराम बँक, सार्वजनिक वाचनालय, हिंद हाउसिंग सोसायटी, आनंदवाडी नागरिक संघटना यांसह अनेक संस्थांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

