बेळगाव : ओलमणी येथील Rajrshi Shahu High School Olamani येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सदिच्छा समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री रायाप्पा कालमनकर यांनी भूषविले.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींच्या ईशस्तवन आणि स्वागत गीताने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच Chhatrapati Shahu Maharaj आणि Mahatma Jyotiba Phule यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
प्रास्ताविक करताना मुख्याध्यापक सी. एस. कदम यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेत विद्यार्थ्यांनी यंदाही उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवावी, असे आवाहन केले. शैक्षणिक वर्षाचा वार्षिक अहवाल एन. व्ही. पाटील यांनी सादर केला.
यावेळी विविध क्रीडा आणि शैक्षणिक स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. क्रीडा शिक्षक चापगावकर यांनी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण केले. यावर्षीची जनरल चॅम्पियनशिप मुलांमध्ये साक्षात धोंडीबा बैलूरकर तर मुलींमध्ये सरिता राजाराम देसाई यांनी मिळवली.
समारंभाच्या निमित्ताने शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये निवृत्त सैनिक मुकुंद देसाई, तातोबा देसाई, आयटीबीपी जवान भाग्यश्री भरमानी मुळीक, शिक्षक लक्ष्मण देसाई तसेच टी. बी. मजगावी यांचा समावेश होता.
प्रमुख पाहुणे के. एच. कौंदलकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना यशासाठी मेहनत, प्रामाणिकपणा आणि चिकाटी आवश्यक असल्याचे सांगितले. प्रमुख वक्ते दत्ता कणबर्गी यांनी विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून जिज्ञासू वृत्तीने अभ्यास करण्याचा सल्ला दिला आणि दहावीच्या परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी इयत्ता आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनी भाषणे सादर करत शाळेतील आठवणींना उजाळा दिला तसेच शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमात दत्ता कणबर्गी यांनी दिलेल्या ५० हजार रुपयांच्या पुस्तक देणगीचे वितरण करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी ‘उमंग भाग २’ या हस्तलिखित अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी चेअरमन तुकाराम हनमंतराव साबळे यांनी विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रेरणा दिली. विविध मान्यवर आणि शिक्षकांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देत बक्षिसांची घोषणाही केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए. जे. सावंत यांनी केले तर आभार प्रदर्शन एन. व्ही. पाटील यांनी केले. या समारंभाला शाळा सुधारणा मंडळाचे सदस्य, पालक, गावकरी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

