बेळगाव | प्रतिनिधी
दिल्लीमध्ये झालेल्या भयंकर स्फोटानंतर देश व राज्यभरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, बेळगाव शहरातही हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी सुरक्षाव्यवस्था कडक केली आहे.
पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे स्टेशन, विमानतळ आणि शहरातील सर्व संवेदनशील ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वाड (BDDS) तसेच डॉग स्क्वाड यांच्या पथकांनी रेल्वे स्थानक परिसराची संपूर्ण तपासणी केली.
तपासणीदरम्यान आरपीएफच्या सहकार्याने प्रवाशांचे सामान, वेटिंग हॉल, प्लॅटफॉर्म व परिसरातील सर्व भागांची बारकाईने तपासणी करण्यात आली. शहरात सतत गस्त ठेवण्यात येत असून सर्वेलेन्स यंत्रणांद्वारे हालचालींवर नजर ठेवली जात आहे.
आयुक्त बोरसे यांनी नागरिकांना आवाहन केले की, “शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखा, परंतु सतर्क राहा. कुठलीही संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्या.”
शहरातील सुरक्षाव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी सर्व विभागांमध्ये समन्वय साधला जात असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

