बेळगाव | प्रतिनिधी
शहरातील क्लब रोड परिसरातील आलिशान इफा हॉटेलमध्ये अचानक आग लागल्याची घटना घडली असून या आगीत हॉटेलचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र, हॉटेल कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे आणि अग्निशमन दलाच्या वेगवान कारवाईमुळे मोठी जीवितहानी टळली.
आग लागल्याची जाणीव होताच हॉटेल प्रशासनाने तातडीने सर्व ग्राहकांना खोल्यांमधून बाहेर काढले. तळमजल्यावरील रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी बसलेल्या नागरिकांमध्येही काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
धूर मोठ्या प्रमाणावर साचल्याने परिस्थिती गंभीर बनली होती. अशावेळी कर्मचाऱ्यांनी काही खोल्यांच्या काचा फोडून धूर बाहेर जाण्याचा मार्ग मोकळा केला. वरच्या मजल्यांवर अडकलेल्या कर्मचाऱ्यांना अग्निशमन दलाने सुरक्षित बाहेर काढले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
या प्रकरणाची नोंद कॅम्प पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

