खानापूर तालुक्यात हत्तींचा कहर; शेतकऱ्यांचे पिक उद्ध्वस्त, वनविभाग गाढ झोपेत!
खानापूर (प्रतिनिधी) – खानापूर तालुक्यातील जंगलालगतच्या गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून हत्तींच्या कळपाने थैमान घातले आहे. प्रचंड मेहनतीने पिकवलेली शेती काही क्षणात उध्वस्त होत असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. वनविभागाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थांचा संताप वाढत आहे.
गेल्या पंधरवड्यापासून मास्केनट्टी, भूरणकी, करिकट्टी, गस्टोळी या गावांमध्ये हत्तींचा उपद्रव सातत्याने सुरू आहे. हे हत्ती दिवसेंदिवस लोकवस्तीच्या दिशेने सरकत असून, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवार, २४ ऑक्टोबर रोजी मास्केनट्टी गावाजवळ हत्तींच्या उपस्थितीमुळे नागरिकांमध्ये मोठी धावपळ उडाली.
स्थानिकांनी हत्तीला हाकलण्यासाठी प्रयत्न सुरू केले असले तरी वनअधिकाऱ्यांकडून मदतीचा हात अजूनपर्यंत मिळालेला नाही. “वनविभागाचे अधिकारी केवळ पाहुण्याच्या भूमिकेत आहेत, आणि शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी स्वतःच झगडावे लागत आहे,” अशी तीव्र नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली.
शेती हा एकमेव आधार असलेल्या ग्रामीण शेतकऱ्यांना हत्तींच्या हल्ल्यामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात आर्थिक तोटा सहन करावा लागतो. नुकसानभरपाई मिळण्यातही अनेकदा दिरंगाई होत असल्याने शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकतात. काही शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत, असे स्थानिकांनी सांगितले.
ग्रामस्थांनी वनमंत्री, आमदार आणि जिल्हा प्रशासनाकडे तातडीने हस्तक्षेप करून हत्ती हल्ल्यांपासून संरक्षणासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
स्थानिक नागरिकांनी हत्तींच्या हालचालींचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून, संपूर्ण परिसरात या घटनेबाबत चिंतेचे वातावरण आहे.

