- बेळगावात पोलिस विभागाच्या वाचनालय व संशोधन केंद्राचे उद्घाटन
बेळगाव : पोलिस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी तसेच संशोधन आणि प्रशिक्षण क्षेत्रात नवनवीन संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने पोलिस विभागाच्या वाचनालय व संशोधन केंद्राचे उद्घाटन बेळगाव येथे करण्यात आले.
या सोहळ्यास बेळगाव उत्तरचे आमदार असीफ (राजू) सैठ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, “अशा प्रकारच्या सुविधा पोलिस विभागाची कार्यक्षमता आणि व्यावसायिक कौशल्य वाढविण्यात मोठी भूमिका निभावतील. तसेच पोलिस दलात अध्ययन आणि संशोधनाची संस्कृती दृढ होईल.”
कार्यक्रमाला कर्नाटक राज्याचे पोलीस महासंचालक व निरीक्षक जनरल डॉ. एम. ए. सलीम, उत्तर विभागाचे आयजीपी डॉ. चेतनसिंह राठोड, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलीस आयुक्त गुलाबराव भोरसे, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते.
या नव्या केंद्रामुळे पोलिस कर्मचाऱ्यांना अद्ययावत माहिती, कायदेशीर संदर्भ व प्रशिक्षण साधने एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असून, त्याचा उपयोग त्यांच्या दैनंदिन कामकाजात आणि व्यावसायिक प्रगतीत होणार आहे.

