भाजप बेळगाव ग्रामीण मंडळाच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन
बेळगाव : भारतीय जनता पक्ष बेळगाव ग्रामीण मंडळाच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून, त्यांच्या जीवनकार्य व विचारधारेवर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकिर्दीतील विविध योजनांचे दर्शन घडवणारी प्रदर्शनीही उभारण्यात आली होती.
या प्रसंगी माजी मुख्यमंत्री आणि खासदार जगदीश शेट्टर, तसेच भाजप जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी आगामी ग्रामपंचायत व तालुका पंचायतीच्या निवडणुकीत सर्व जागा जिंकण्यासाठी आणि पुढील विधानसभा निवडणुकीत ग्रामीण मतदारसंघात भाजप उमेदवार विजयी व्हावा यासाठी बूथस्तरावर संघटना मजबूत करण्याचे आवाहन केले.
राज्यसभा खासदार ईरन्ना कडाडी व माजी आमदार संजय पाटील यांनी काँग्रेस सरकारवर टीका करताना, "सत्ताधाऱ्यांच्या गैरव्यवहार, अंतर्गत मतभेद आणि अपुऱ्या अर्थसंकल्पामुळे हमी योजना अर्धवट राहिल्या आहेत. विकासाच्या आघाडीवर सरकार अपयशी ठरले असून, राज्यातील जनता आज सरकारवर नाराज आहे," असे मत व्यक्त केले.
तसेच विधान परिषदेचे माजी मुख्य सचेतक महांतेश कवटगीमठ व ज्येष्ठ नेते एम.बी. जिरळी यांनी मोदी सरकारच्या ११ वर्षांच्या कारभाराचे कौतुक केले. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत आज जागतिक स्तरावर शक्तिशाली राष्ट्र म्हणून ओळखला जात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली गरीब कल्याणासाठी अनेक उपयुक्त योजना राबवण्यात आल्या आहेत," असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाला ग्रामीण मंडळाध्यक्ष युवराज जाधव, जिल्हा सरचिटणीस मल्लिकार्जुन मादम्मनवर, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष रामचंद्र मन्नोलकर, विनय कदम, भाजप ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश पुरी, एससी मोर्चा जिल्हाध्यक्ष यल्लेश कोलकार, कोषाध्यक्ष संतोष देशनूर, विविध आघाड्यांचे जिल्हा समन्वयक महेश मोहिते यांच्यासह पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

