बेळगाव :
कर्नाटक सरकारने आपल्या परंपरेनुसार यंदाही विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्योत्सव पुरस्कार २०२५ जाहीर केले आहेत. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि राज्याच्या प्रगतीत मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्याचा सरकारचा हा उपक्रम कायम राहिला आहे.
शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल मराठा मंडळाच्या अध्यक्षा सौ. राजश्री नगराजू आणि श्री. पुंडलीक शास्त्री या दोघांची राज्योत्सव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन साधण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय मानले जात आहे.
राजश्री नगराजू यांनी मराठा मंडळाच्या माध्यमातून उच्च शिक्षण, तांत्रिक शिक्षण आणि महिला शिक्षण क्षेत्रात सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. तर पुंडलीक शास्त्री यांनी शिक्षण क्षेत्रात अध्यापन, संस्कार आणि ज्ञानप्रसाराच्या माध्यमातून समाजात ठसा उमटवला आहे.
या दोन्ही मान्यवरांचा सन्मान राज्योत्सव दिनानिमित्त औपचारिक सोहळ्यात करण्यात येणार असून, त्यांच्या निवडीबद्दल शैक्षणिक आणि सामाजिक वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

