अथणी (जि. बेळगाव) : साईट व्यवहाराच्या आर्थिक वादातून लाच मागणीचा आरोप झाल्याने अथणी पोलीस ठाण्याचे सीपीआय संतोष हळ्ळूर यांच्याविरुद्ध लोकायुक्त पोलिसांनी गुन्हा नोंदवून कारवाई सुरू केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अथणीतील मीरासाब मुझावर यांनी लोकायुक्त कार्यालयात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांनी अनुक्रमे दोन साईट खरेदी करण्यासाठी अथणी येथील अनुपकुमार नायर यांना सुमारे २० लाख रुपये दिले होते. मात्र ठरलेल्या वेळेत साईट न दिल्याने मुझावर यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती.
या प्रकरणात चौकशी दरम्यान सीपीआय संतोष हळ्ळूर यांनी आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. फोनवरील संभाषणाच्या ऑडिओ रेकॉर्डिंगच्या आधारे लोकायुक्त कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली.
लोकायुक्त पोलिसांनी तक्रारीची नोंद घेऊन प्राथमिक तपासानंतर गुरुवारी (१३ नोव्हेंबर) अथणी पोलीस ठाण्यावर छापा टाकून तपास सुरू केला.
दरम्यान, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सीपीआय संतोष हळ्ळूर यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. त्यांनी स्पष्ट केले की, “मी कोणत्याही व्यक्तीकडे पैशाची मागणी केलेली नाही. उलट समोरील व्यक्तीच वारंवार फोन करून पैशांच्या बाबतीत बोलत होती,” असे त्यांनी म्हटले.
लोकायुक्त पोलिसांकडून या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू असून, या तपासाचा निकाल काय येतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

