बेळगाव | प्रतिनिधी
आजच्या धावपळीच्या काळातही माणुसकी अजून जिवंत आहे, याचा प्रत्यय देणारी घटना बेळगाव मध्यवर्ती बस स्थानक परिसरात घडली. कणकुंबी येथील रहिवासी रमेश नाईक यांचे पैशांचे पाकीट काल बस स्थानकाच्या दिशेने जात असताना हरवले होते.
हे पाकीट रोहित मारिहाळ यांना सापडले. पाकिटामध्ये सुमारे ७,००० रुपये रोख रक्कम तसेच ओळखपत्रे होती. प्रामाणिकपणाचे दर्शन घडवत रोहित मारिहाळ यांनी ओळखपत्रावरील पत्त्याच्या आधारे रमेश नाईक यांच्याशी संपर्क साधला.
आज रमेश नाईक यांना हे पाकीट संपूर्ण रक्कम व कागदपत्रांसह सुरक्षितरीत्या सुपूर्द करण्यात आले. आपले हरवलेले पाकीट पुन्हा मिळाल्याने रमेश नाईक यांनी समाधान व्यक्त करत रोहित मारिहाळ यांचे आभार मानले.
या घटनेमुळे “माणसाचे कर्म चांगले असावे” ही म्हण पुन्हा एकदा खरी ठरल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत असून, समाजात प्रामाणिकपणा आणि माणुसकी अजूनही टिकून असल्याचा विश्वास दृढ झाला आहे.

