बेळगाव : शहरातील हिंदवाडी भागातील जैन कॉलेजच्या परिसरात मेघा गॅस कंपनीच्या पाइपलाइनमध्ये अचानक गळती झाल्याची घटना घडली. परिसरातील नागरिकांनी तातडीने याची माहिती नगरसेवक नितीन जाधव यांना दिल्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार, परिसरातील एका नागरिकाकडून घराच्या कंपाऊंड भिंतीचे बांधकाम सुरू असताना जेसीबी मशीन काम करत होते. यावेळी चुकून जेसीबीचा धक्का बसल्याने जमिनीखालील गॅस पाइपलाइनला भगदाड पडले आणि गळती सुरू झाली.
ही बाब लक्षात येताच स्थानिक नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र नगरसेवक नितीन जाधव यांनी त्वरित मेघा गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कर्मचाऱ्यांना घटनास्थळी बोलावले.
कंपनीच्या तांत्रिक पथकाने तत्काळ कारवाई करत संबंधित पाइपलाइन बंद केली व गळती रोखण्यात यश मिळवले. त्यामुळे संभाव्य मोठा अपघात टळला.
नगरसेवकांच्या तत्पर हस्तक्षेपामुळे समस्या वेळीच नियंत्रणात आल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

