गोकाक (प्रतिनिधी):
सतीश जारकीहोळी यांनी गोकाक तालुक्यातील लोलसूर गावाजवळ घटप्रभा नदीवर उभारण्यात येत असलेल्या 30.21 कोटी रुपयांच्या नव्या पुलाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. या पुलामुळे स्थानिक नागरिकांसह वाहनधारकांना वर्षभर सुरक्षित आणि सुलभ वाहतूक सुविधा उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
ब्रिटिश काळात उभारण्यात आलेला जुना अरुंद पूल आणि 1964 मध्ये बांधण्यात आलेल्या मोठ्या पुलाच्या मधोमध हा नवा पूल उभारला जात आहे. दोन्ही विद्यमान पुलांना कोणतीही हानी न पोहोचवता काम पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
यानंतर मंत्री जारकीहोळी यांनी संकेश्वर–यरगट्टी राज्य महामार्गावरील घटप्रभा शहराजवळ कालव्यावर उभारण्यात येणाऱ्या नव्या पुलाच्या कामाचीही पाहणी केली. वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी तात्पुरत्या पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
घटप्रभा येथील मोरारजी विद्यालय येथेही मंत्री जारकीहोळी यांनी भेट देत शाळेतील पायाभूत सुविधा, वसतिगृह व्यवस्था आणि शैक्षणिक उपक्रमांची माहिती घेतली. विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी उच्च शिक्षण घेऊन समाजासाठी आदर्श घडवण्याचे आवाहन केले.
या दौऱ्यात मंत्रीमंडळातील सहकारी व स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

