बेळगाव : शहरातील न्यायालयाच्या इमारतीत मंगळवारी सकाळी एक अनोखी घटना घडली. कामकाज सुरू होताच एका माकडाने न्यायालयात प्रवेश करून तब्बल दोन तास परिसरात वावर केल्याने उपस्थितांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
साक्षीदारांच्या माहितीनुसार, हे माकड जिन्याने आत शिरत तळमजल्यापासून पहिल्या मजल्यापर्यंत मुक्तपणे फिरत होते. न्यायालयात तारीख असलेल्या व्यक्तीसारखे ते इकडे-तिकडे पाहत फिरत असल्याने काही काळ उत्सुकता तर काही वेळातच घबराट पसरली.
दरम्यान, एका ठिकाणी बसून लोकांची हालचाल पाहत असलेल्या माकडाने अचानक कोर्ट ड्युटीवरील एका पोलिसावर उडी मारली. या घटनेत पोलिसाला धक्का बसला असून, तो क्षणभर गोंधळून गेला. सुदैवाने कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.
या अनपेक्षित प्रकारामुळे वकील, पक्षकार आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. काही वेळानंतर माकड स्वतःहून बाहेर निघून गेल्याने परिस्थिती पूर्ववत झाली.

